Monday, July 8, 2024

ख्रिस्ती लोक रविवारी सहभागीतेसाठी का जमतात?मग बहुतेक वेळा ख्रिस्ती मंडळी रविवारी का जमते? आणि हा दिवस शब्बाथ दिवसासारखा पाळतात का?


ख्रिस्ती लोक रविवारी सहभागीतेसाठी का जमतात?
मग बहुतेक वेळा ख्रिस्ती मंडळी रविवारी का जमते? आणि हा दिवस शब्बाथ दिवसासारखा पाळतात का? 

अ. प्रभूच्या दिवशी सहाभागिते साठी एकत्र जमण्याची मंडळीची रीति
पारंपारिकरित्या ख्रिस्ती मंडळी रविवारी उपासनेसाठी जमते याचे कारण म्हणजे, प्रभू यीशू या दिवशी मेलेल्यातून उठविला गेला होता. ( मत्तय 28:1, मार्क 16:1, लूक 24:1, योहान 20:1) 
जी मंडळी प्रभू येशूच्या बलिदान आणि पुनरुत्थान द्वारे स्थापित झाली ती आठवड्याच्या पहिल्या दिवशी उपासनेसाठी एकत्र येत असे असा स्पष्ट उल्लेख आपण नव्या करारात वाचतो. त्या काळी प्रारंभीच्या मंडळीमध्ये ही रीतच झाली होती. (1 करिंथ 16.2) मंडळी प्रभु येशुच्या पुनरुत्थानाच्या दिवशी अर्थात आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी उपासने साठी जमत असे. प्रेषित 20.7 
प्रकटीकरण 1.10 मध्ये योहान म्हणतो, “प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो.... ”  
तत्पूर्वी पेंटेकॉस्ट्च्या ज्यादिवशी मंडळीची स्थापना झाली तो ही आठवड्याचा पहिला दिवसच होता. प्रेषित 2:1 यरुशलमेत सुरवातीला मंडळीचा एकत्र येण्यास कोणताही एक असा विशेष दिवस नव्हता, तर ते दररोज उपासनेसाठी जमत असत. वाचा प्रेषित 2.46 ते दररोज एकचित्ताने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुति करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत.   
जरी असे असले तरी ख्रिस्ती मंडळीने रविवार किंवा शनिवार अश्या कोणत्यातरी एकाच दिवशी विशेषरित्या उपासनेसाठी जमावे अशी कोणतीही आज्ञा पवित्र शास्त्रात दिलेली नाही. रोम 14:5-6 “कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो दूसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खातरी करून घ्यावी. जोअ दिवस पाळतो, तो प्रभूकरिता पाळतो, आणि जोअ पाळित नाही तो प्रभूकरिता पाळित नाही.” आणि कलस्से 2:16 “तर मग खाण्यापिण्याविषयी, तसेच सण अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका” यांसारखी शास्त्रवचने ख्रिस्ती लोकांना प्रत्येक दिवस खास म्हणून पाळण्याचे स्वातंत्र्य देतात. 
ब. सार्वजनिक सूट्टीच्या दिवशी सहभागितेसाठी भेटणे सोयिस्कर असते...
तसेच ख्रिस्ती मंडळी ही प्रामुख्याने रविवारी उपासनेस जमते याचे आणखी एक कारण म्हणजे आपल्या देशात आणि जवळ पास सगळ्या देशात रविवारी सुट्टी असते म्हणून ख्रिस्ती मंडळीला या दिवशी एकत्र येऊन देवाची उपासना करणे सोयीस्कर जाते म्हणून. परंतु बऱ्याच आखाती आणि मुस्लिम देशात चर्च शुक्रवारी भरते. नेपाल सारख्या देशात शनिवारी सुट्टी असते तेथे चर्च शनिवारी भरते. 

ख्रिस्ती मंडळी रविवार किंवा ज्या सुट्टीच्या दिवशी एकत्र सहभागिता करतात: तो दिवस ते शब्बाथ दिवसा सारखा पाळतात का? 
तर उत्तर आहे, नाही, 
आम्ही खिस्ती लोक या दिवशी देवाची उपासना, मंडळीच्या पाळकाद्वारे किंवा पुढाऱ्यांद्वारे देवाच्या वचनाचे उपदेशाद्वारे मार्गदर्शन, प्रभुभोजन आणि मंडळीतील इतर लोकांशी सहभागिता करतो. ख्रिस्ती मंडळी भेटण्याच्या कोणत्याही दिवसाला शब्बाथ दिवसासारखे पाळत नाहीत. त्या दिवसी कोणतेही काम करू नये किंवा उपवास पाळवा असे कोणतेही बंधन आपण नव्या करारात किंवा ख्रिस्ती इतिहासात पाहत नाही. 

 ख्रिस्ती मंडळी प्रभूच्या दिवशी अर्थात रविवारीच सहभागिते साठी भेटत असे याचे प्रारंभीच्या पुढाऱ्यांच्या लेखातून ऐतिहासिक पुरावे... 
ख्रिस्ती मंडळी रविवारी अर्थात प्रभूच्या दिवशी सहभागीतेसाठी एकत्र जमत असे त्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. प्रारंभीच्या पुढाऱ्यांना प्रेषितीय शिक्षण योग्य प्रमाणे समजले होते. सुंता आणि नियमशास्त्रातील इतर नियमाच्या जोखडाखाली पुन्हा अडकले जाऊ नये म्हणुन त्यांनी शब्बाथ पाळणाचा पुरस्कार केला नाही. ईस्वी सन 100 ते 450 पर्यंतचे सर्व अर्ली चर्च फादर्सचे लेख आणि ऐतिहासिक लेखांवरुन आपल्याला कळते की ख्रिस्ती मंडळी ही प्रभूच्या दिवशीच (रविवारी) उपासनेसाठी भेटत असे. खालील अवतरणांवरून दिसून येते की आरंभीचे ख्रिस्ती हे रविवारी उपासनेसाठी जमले. 
दिदाखे 
 "पण प्रत्येक जन प्रभूच्या दिवशी (रवीवारी) . . . एकत्र जमून भाकर मोडा आणि तुमचे अपराध कबूल केल्यावर उपकारस्तुती करा, म्हणजे तुमाची उपासनारुपी यज्ञ शुद्ध ठरेल. परंतु जोपर्यंत तुमच्या सोबत्याशी मतभेद आहेत त्याचा तुमच्याबरोबर समेट होईपर्यंत कोणीही एकत्र येऊ नये, जेणेकरून तुमची उपासना अपवित्र होऊ नये. (A.D. 52-150)
बर्णबाचे पत्र
 “जे लोक [उदा. यहूदी] प्राचीन नियमात वाढलेले होते ते आता नवीन आशेत आले आहेत, ते यापुढे शब्बाथ पाळत नाहीत, परंतु प्रभूच्या दिवसाचे पालन करत आहेत, कारण त्याच्या मृत्यूने आपले जीवन पुन्हा संजीवित झाले आहे" (मॅग्नेशियन्सना पत्र 8) [A.D.110].
रक्तसाक्षी झालेला जस्टिन 
 “परंतु रविवार हा दिवस आहे ज्या दिवशी आपण सर्व एकत्र जमतो, कारण तो पहिला दिवस आहे ज्या दिवशी देवाने अंधार (देवाने प्रकाश तयार केला) आणि पदार्थांमध्ये बदल घडवून आणला आणि जग घडवले; आणि त्याच दिवशी आपला तारणहार येशू ख्रिस्त मेलेल्यांतून उठला” (First Apology 67) [A.D.155].

No comments:

Post a Comment